मराठवाड्यातील दुष्काळाची भीषण दाहकता पुन्हा एकदा समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील प्रयोगशील शेतकरी नाना सुरडे यांनी तब्बल साडेसात लाख रुपये भांडवली खर्च करून उभारलेली ५ एकरांतील सिमला मिरचीची लागवड पाणी नसल्याने डोळ्यादेखत करपून गेली. विहिरी आणि बोअरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्याने अखेर उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने संपूर्ण उभ्या पिकावर थेट रोटावेटर फिरवून नांगरट केली. लाखो रुपयांचा उत्पादन खर्च वाया गेल्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून शासनाने तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून हेक्टरी भरीव नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.